लातूर : लातूर हा काँग्रेसचा पारंपारिक गड भाजपने गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर केला असला तरी यंदा जातीय समीकरणाची किनार लाभलेल्या या निवडणुकीत भाजपसाठी हा गड राखण्याचे मोठे आव्हान असतानाच काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी या निमित्ताने लागली आहे. जातीय मतपेढीचा परिणाम वाढवा, लिंगायत मतांचा जोर काँग्रेसच्या बाजूने व्हावा या काँग्रेसच्या व्यूहरचनेला भाजपची मंडळी प्रत्युत्तर देत आहेत. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामुळे जातीय मतपेढीचे गणित आम्हीही मांडू असे उत्तर देण्यात आले आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा गड माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे या मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आले आठव्यांदा त्यांचा रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून दारुण पराभव झाला. त्यानंतर २००९ साली हा मतदारसंघ राखीव झाला .विलासराव देशमुख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत या मतदारसंघात कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देत निवडून आणले त्यानंतर २०१४ व २०१९ अशा सलग दोन निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. २०२४ ला या पराभवाचा वचपा काढायचा या जिद्दीने आमदार अमित देशमुख व त्यांचे साथीदार कामाला लागले आहेत तर हा मतदारसंघ एकदा आपल्या ताब्यात आला आहे तो आपल्या ताब्यातून जाऊ द्यायचा नाही या जिद्दी जिद्दीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मंडळी कामाला लागली आहेत.