लातूर हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा. लातूर हे नाव जगात दोन गोष्टींमुळे खूप गाजलं. एक म्हणजे 1993 सालचा प्रलयकाली भूकंप, आणि दुसरे म्हणजे 2016 चा दुष्काळ आणि त्यात रेल्वेने आणलेलं पाणी. या व्यतिरिक्त शिक्षणाचा लातूर पॅटर्न म्हणूनही देशभरात लातूरचा गौरव होतो.

या जिल्ह्याने महाराष्ट्राला आतापर्यंत दोन मुख्यमंत्री दिले आहेत. केंद्रीय मंत्री पदही लातूर जिल्ह्याला लागली.

लातूर जिल्ह्याची निर्मिती ही 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभागणीतून झाली. लातूर जिल्हा निर्मितीचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना जाते.

लातूरचा ऐतिहासिक वारसा.

लातूरचा इतिहास हा प्राचीन आहे. लातूर ही राष्ट्रकूट घराण्याचे राजधानी होती. लातूर सम्राट अशोक, चालुक्य या राज्याचा भाग होता. लातूरचे जुने नाव रत्नापूर, लटेटूर असे होते. कालांतराने लातूर हे नाव रूढ झाले. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्यापूर्वी निजाम आणि मराठा सैन्यामध्ये लातूर मधील उदगीर या ठिकाणी लढाई झाली होती. ही लढाई मराठा सैन्याने जिंकून पानिपत कडे कुच केली.

लातूर हा नंतरच्या काळात हैदराबादच्या निजामशाहीचा भाग बनला. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये लातूरचे खूप मोठे योगदान आहे. लातूर जिल्ह्यामध्ये दोन भुईकोट किल्ले आहेत. एक औसा तर दुसरे उदगीर या ठिकाणी. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ या ठिकाणी संजीवनी बेट नावाचं एक डोंगर आहे. त्या डोंगरावरती अनेक प्रकारचे औषधी वनस्पती पहावयास मिळतात. त्याला मान्यता अशी आहे की ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती, त्यावेळेस हनुमान जी संजीवनी बुटी आणण्यासाठी गेले होते ते संजीवनी बुटी आणत असताना त्याचा काही भाग या ठिकाणी पडला. आणि त्यामुळे येथे अनेक प्रकारची वनस्पती औषधाची झाडे आपणास दिसून येतात.

लातूरचा सांस्कृतिक वारसा.

लातूर हे अनेक कलागुणांनी विकसित असलेला जिल्हा आहे. लातूरचे सर्वात मोठे सांस्कृतिक वारसा म्हणजे लातूर मधील गंजगोलाई ही बाजारपेठ. निजाम काळात निर्माण झालेली ही बाजारपेठ म्हणजेच देशातील पहिले शॉपिंग मॉल म्हटले तरी चुकीचं ठरणार नाही. कारण त्याची रचनाच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचे आहे. एकूण 16 रस्ते या बाजारपेठेत एकत्र येतात. आणि प्रत्येक रस्त्याच्या कडेला एका विशिष्ट वस्तूचे दुकाने आपणास पाहायला मिळतील. उदाहरणात सांगायचं झालं तर तुम्ही सोनार लाईनला गेलात तर तुम्हाला फक्त सोना चांदीचे दुकाने दिसतील. तुम्ही कापड लाईन मध्ये गेलात तर फक्त कपड्याचे दुकाने तुम्हाला दिसतात. म्हणजे इतकी वैशिष्ट्ये पूर्ण रचना या गोलाईची करण्यात आली आहे.

त्याचबरोबर श्रीराम गोजमगुंडे सारखे मोठे रंगकर्मी हे लातूरच्याच भूमितील. असा मोठा सांस्कृतिक वारसा हा लातूर जिल्ह्याला लाभला आहे. लातूरमध्ये भारुड, लावणी, वाघ्या मुरळ्या, सारखे लोक प्रकार दिसून येतात.

  लातूर हा शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रगत जिल्हा आहे. 2023 च्या दहावीच्या निकालामध्ये राज्यात एकूण 151 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले. त्यापैकी 108 विद्यार्थी हे फक्त लातूर जिल्ह्यातील होते. यावरून लातूरची शिक्षणातील प्रगती आपणास दिसून येईल. 

त्याचबरोबर नीट या परीक्षेत गेल्या वर्षी 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण मिळवले होते.
नीट जेईई या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी हे लातूरला येतात. कारण येथील एकूण शैक्षणिक वातावरण त्या पद्धतीने विकसित झाले आहे.

लातूरमध्ये ज्या ठिकाणी नीट आणि जेईई चे क्लासेस चालतात. ट्युशन एरियाची वार्षिक आर्थिक उलाढाल ही दीड हजार कोटीहून अधिक आहे. यावरून लक्षात येईल, की किती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे लातूरला शिक्षणासाठी पसंती देतात.

लातूर जिल्ह्याने उद्योगधंद्यात ही मोठी प्रगती केली आहे. आशिया खंडातील पहिली डालडा फॅक्टरी ही लातूर जिल्ह्यात उभारले गेली होती. त्याच पद्धतीने येथील सुत मिल ही खूप प्रसिद्ध होती. लोकमान्य टिळक यांनी स्वतः लातूरमध्ये छपाई कारखाना सुरू केला होता. आज लातूर एमआयडीसीत टीना ऑइल मिल, कीर्ती ऑइल मिल, गणेश बेकरी, ट्वेंटीवन ऍग्रो यासारखे मोठे उद्योग दिसून येतात.

लातूर जिल्ह्याने सहकार क्षेत्रातील खूप भरारी घेतली आहे. हा जिल्हा दुष्काळग्रस्त असूनही या जिल्ह्यात दहाहून अधिक साखर कारखाने चालतात.

लातूर जिल्ह्यात औसाचे येथे तर लातूर शहरात जुनी आणि अतिरिक्त अशा तीन एमआयडीसी आहेत. त्याचबरोबर उदगीर, चाकूर या ठिकाणी एमआयडीसी प्रस्तावित आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक लहान-मोठे उद्योग या जिल्ह्यात चालतात.

लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही खूप मोठी आहे. भारतातील सोयाबीन आणि तूरी चा भाव हा लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघतो. इतकं मोठं महत्त्व लातूरच्या बाजार समितीला आहे.

एवढं लातूरला असलं तरीही लातूरमध्ये आज अनेक समस्या आहेत. लातूरचा पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही. दुष्काळ सतत पडत असतो. त्यावर ठोस उपाययोजना अजूनही अमलात आलेल्या नाहीत. लातूरमध्ये मोठी एमआयडीसी असून जिल्ह्याबाहेरील एकही मोठा उद्योग या एमआयडीसीत नाहीत. लातूरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे. लातूरचे तरुण रोजगार शोधण्यासाठी पुणे, हैदराबाद या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. वाढती गुन्हेगारी हे सुद्धा लातूर जिल्ह्यातील समस्या आहे.

विलासराव देशमुख यांच्यानंतर लातूरला प्रभावी राजकीय नेतृत्वाचा प्रकर्षाने अभाव जाणवतो.

एकंदरीत लातूर हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्याला राजकीय दूरदृष्टी असलेला, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असलेला जर नेतृत्व लाभलं तर लातूरचा सर्वांगीण विकास होण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

By admin